गांधीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त आई हीराबेन यांच्यासोबत काही काळ व्यतीत केला. यानिमित्त त्यांनी दुपारचे भोजन आपल्या आईसोबत केले. आईचा आशीर्वाद घेत त्यांनी वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. मोदींच्या आईचे घर गुजरातमधील गांधीनगरजवळ आहे. याआधी मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वीही आईचे आशीर्वाद घेतले होते.
वाढदिवसानिमित्त मोदी नर्मदा धरणावरही गेले. येथे धरणानजिकच्या जंगलात त्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या कारमधून 'जंगल सफारी'ही केली.
यानंतर त्यांनी केवडिया गार्डनमधील बटरफ्लाय पार्कचा दौरा केला. त्यानंतर ते केवाडियामधील कॅक्टस गार्डनमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि राज्यपाल आचार्य देवव्रत हेही उपस्थित होते.
मोदींनी नमामि देवी नर्मदा महोत्सव अंतर्गत सरदार सरोवरला भेट दिली. तेथे त्यांच्या हस्ते नर्मदा नदीची महाआरती करण्यात आली. धरणामुळे तयार झालेल्या सरदार सरोवराच्या काठावरील गरुडेश्वर मंदिरात मोदींनी भगवान दत्तात्रेयांची पूजा-अर्चाही केली.
यानंतर मोदी सरदार वल्लभभाई पटेलांचा जगातील सर्वांत उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पोहोचले. येथे विविध पारंपरिक पर्यावरणपूरक उत्पादने तयार केली जातात. ही उत्पादने तयार करण्याची प्रक्रिया मोदींनी जाणून घेतली. तसेच, येथील नर्सरीलाही मोदींनी भेट दिली.
भाजपतर्फे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात भाजप कार्यकर्ते स्वच्छता आणि सामाजिक सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन गृहमंत्रई अमित शाह यांनी केले. या वेळी, दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात शाह यांच्यासह भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, विजय गोयल, विरेंद्र गुप्ता, खासदार गौतम गंभीर, हंसराज हंस, मीनाक्षी लेखी यांनीही रुग्णालयाची स्वच्छता केली. यादरम्यान देशभरात स्वच्छता अभियान राबवले जाणार असून रक्तदानही करण्यात येणार आहे.