हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) कोरोना लसीवर काम करणाऱ्या गुजरात आणि हैदराबाद येथील कंपन्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी लस तयार करण्याच्या कामाचा आढावा घेतला. तसेच संशोधकांचा कामाची प्रशंसा करत त्यांची पाठ थोपटली. गुजरात राज्यातील झायडस कंपनी आणि हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीला मोदींनी भेट दिली.
संशोधकांची थोपटली पाठ
गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात झायडस बायोटेक कंपनी आहे. ही कंपनी डीएनएवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करून स्वदेशी लस तयार करण्याचे प्रयत्न करत असून त्यात कंपनीला यशही येत आहे. झायडस कंपनीने कॅडीला या दुसऱ्या एका औषधनिर्मिती कंपनीशी सहकार्य करून संशोधन सुरू केले आहे. मोदींनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. लसीसंदर्भात सर्व माहिती मोदींनी घेतली. लस संशोधनात भारत सरकार फार्मा कंपन्यांना सहकार्य करत असल्याचे मोदी त्यावेळी म्हणाले. ट्विट करून मोदींनी त्यांच्या व्हॅक्सीन दौऱ्याची माहिती दिली.
चाचण्यातील प्रगतीबद्दल भारत बायोटेकच्या संशोधकांचे अभिनंदन
गुजरात दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी हैदराबादला आले. तेथे मोदींनी भारत बायोटेक कंपनीला भेट दिली. लस निर्मितीतील प्रगतीवरून त्यांनी संशोधकांचे अभिनंदन केले. लवकर लस तयार होण्यासाठी भारत बायाटेकची टीम आयसीएमआरबरोबर मिळून काम करत आहे.