पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. 16 जिल्ह्यांमधील 71 जागांसाठी आज मतदान सुरू आहे. राज्यात एकूण ४ टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
राहुल यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल -
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांवरून राहुल यांनी मोदी सरकारवर हल्ला केला. दरवेळी दसऱ्याला रावणाची प्रतिकृती जाळली जाते. मात्र, यावेळी अपवाद ठरला. पंजाबमध्ये रावणाच्या प्रतिकृतीऐवजी पंतप्रधान मोदी आणि काही उद्योगपतींचे पुतळे जाळण्यात आले. ही बाब दुर्देवी आहे. मात्र, यावरून शेतकरी आणि तरुण किती अस्वस्थ आहे हे दिसून येते, असे राहुल म्हणाले.
....तर जनता मोदींना पिटाळून लावेल -
नोटबंदी आणि लॉकडाऊनचा उद्देश सारखाच होता. दोन्ही काळात छोटे उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी आणि शेतकरी-कामगार उद्ध्वस्त झाले. आताच्या भाषणात २ कोटी तरुणांना रोजगार देण्याची भाषा पंतप्रधान करत नाहीत. त्यांना (मोदींना) माहिती आहे, की आपण खोटे बोलत आहोत आणि हे लोकांनाही माहिती आहे. मी खात्रीने सांगू शकतो की पंतप्रधान इथे आले आणि त्यांनी पुन्हा २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले तर लोक त्यांना पिटाळून लावतील, असेही राहुल यांनी सांगितले.
खोटं बोलण्याच्या स्पर्धेत मोदींच्या तुलनेत आम्ही कमी पडलो - राहुल
काँग्रेसने देशाला दिशा दिली. आम्ही मनरेगा योजना राबवली, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. देश कसा चालवायचा हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलो. रोजगार निर्माण केला. मात्र, आम्ही एका गोष्टीत कमी पडलो. ते म्हणजे आम्हाला खोटं बोलता आलं नाही. खोटे बोलण्याच्या स्पर्धेत मोदींसमोर आम्ही कमी पडलो, असा मार्मिक टोला राहुल यांनी लगावला.
पंतप्रधान विदेशाविषयीच बोलतात, देशाविषयी नाही - गांधी
नितीश कुमारांनी २००६मध्ये बिहारमध्ये जे केले तेच पंतप्रधान मोदींनी पंजाब, हरियाणा आणि संपूर्ण देशभरात केले, असा टोला राहुल यांनी लगावला. पंतप्रधान नेहमी इतर देशांबाबत बोलत असतात. मात्र, ते कधीच भारतातील बेरोजगारी आणि इतर समस्यांबाबत बोलत नाहीत, असा आरोपही राहुल यांनी केला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदी आज (बुधवार) बिहारमध्ये ३ रॅली करणार आहेत. दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटण्यामध्ये ते प्रचार करतील. अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिले आहे. जे आम्हाला राम मंदिराची तारीख विचारत होते तेच आज आमच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. आम्ही जे बोललो ते करून दाखवले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींचा तेजस्वीसह काँग्रेसवर निशाणा -
राजद सत्तेवर आल्यास कोविडसाठी मिळत असणाऱ्या निधीसोबत काय होईल, याची कल्पना तुम्ही करू शकता. बिहारचे लोक युवराज तेजस्वी यांच्यापासून अधिक काय अपेक्षा करणार, असा सवालही मोदींनी उपस्थित केला. बिहारची जनता माझ्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांना (तेजस्वी) ओळखते, असेही मोदी म्हणाले. बिहारमधून उद्योग संपवण्यासाठी राजदची ओळख आहे. त्यांनी राज्यात गुंतवणूकदारांना येऊ दिले नाही, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.
मोदींकडून नितीश कुमारांची प्रशंसा -
मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास झाला. बिहारची वाटचाल अंधाराकडून प्रकाशाकडे करण्यात नितीश यांचा महत्त्वाचा वाटा आहे, असे म्हणत मोदींनी नितीश कुमारांवर स्तुतीसुमने उधळली.