चंदीगड - हरियाणा विधानसभा निवडणुकांना अवघे दोनच आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक हे येत्या काही दिवसांत हरियाणामध्ये जोरदार प्रचार करणार आहेत. हरीयाणामध्ये भाजपच्या १०० पेक्षा जास्त सभा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील भाजपच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत. मोदींच्याही हरियाणामध्ये चार प्रचारसभा असणार आहेत. यामधील पहिली सभा ही फरीदाबाद जिल्ह्यातील बल्लभगढ येथे १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबरला दादरी, थानेसर आणि हिसारमध्ये त्यांच्या अन्य सभा होतील.
यासोबतच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील हरियाणामध्ये प्रचारसभा घेतील. ९ ऑक्टोबर रोजी अमित शाह यांच्या कैथल, हिसार, भिवानी आणि रोहतक जिल्ह्यांमध्ये सभा होतील. तर १४ ऑक्टोबर रोजी ते फतेहबाद, पंचकुला, कर्नाल आणि गुरगावमध्ये सभा घेतील. जे. पी. नड्डा यांच्या ११ ऑक्टोबर रोजी चार सभा होतील. त्याच दिवशी योगी आदित्यनाथ यांच्या देखील ठिकठिकाणी सभा होणार आहेत.
हरियाणामध्ये ९० पैकी ७५ जागा मिळवण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलेल्या बबिता फोगट यांना भाजपने हरियाणाच्या दादरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. हरियाणामध्ये २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा : 'कोणतीही भाषा शिका, मात्र आधी आपल्या मातृभाषेचा प्रसार करा' - व्यंकय्या नायडू