नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबरला (शुक्रवारी) सहा राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम होणार आहे. दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना मोदींनी विविध राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आखणार आहे. मागील आठवड्यात त्यांनी गुजरात आणि मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांशी चर्चा केली होती.
हेही वाचा - शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वरात काढली ट्रॅक्टरवर
सुशासन दिनी शेतकऱ्यांशी पंतप्रधान करणार चर्चा
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन सुशासन दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. या दिनी पंतप्रधान मोदी सहा राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत या दिवशी पंतप्रधान मोदी ९ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटींचे वाटप करणार आहेत, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असताना मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा सपाटा लावला आहे. गुजरात आणि मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर विशेषत: काँग्रेसवर हल्लाबोल केला. कृषी कायद्याचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मोदी शेतकऱ्यांना देऊन नव्या कायद्यांना समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा - किसान संघर्ष समितीच्या मोर्चासाठी जळगावातून शेकडो शेतकरी मुंबईला रवाना
गुजरातमधील शेतकऱ्यांशी मोदींनी साधला संवाद
मंगळवारी ( १५ डिसेंबर) पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. 'विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. शेतकऱ्यांच्या मागे राहून विरोधक सरकारवर हल्ला करतेय. कृषी क्षेत्रातील या सुधारणा विरोधकांनाही करायच्या होत्या मात्र, त्यांना सत्तेत असताना ते जमले नाही. भाजपने सुधारणा करून दाखविल्या, असे मोदी म्हणाले होते. कच्छमधील शेतकऱ्यांच्या पंतप्रधानांनी समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्याशी चर्चा केली.