नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. या वर्षातील हा दुसरा मन की बात कार्यक्रम आहे. यावेळी मोदींनी देशातील विविधतेचे रक्षण आणि जतन करण्याचे आवाहन देशवासियांना केले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
- 'देशातील युवक आणि मुलांमध्ये उत्साह आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी काही पावले उचलण्यात आली आहेत. आता तुम्ही श्रीहरीकोटा येथून होणार रॉकेट लाँचिग प्रत्यक्षात समोर बसून पाहू शकता. आता श्रीहरीकोटा रॉकेट लाँचिंग स्टेशन सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.
- देशातील विविधतेचं रक्षण आणि जतन करा
- दिवसेंदिवस देशातील युवा आणि मुलांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड वाढायला लागली आहे. अंतराळामध्ये सॅटेलाईट सोडून भारत नवनवे रेकॉर्ड नोंदवत आहे. याचा प्रत्येक भारतीयाला गर्व आहे.
- काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील 'हुनर हाट' या छोट्याशा ठिकाणावरून देशाची संस्कृती, भव्यता, खाद्यपदार्थ आणि नागरिकांच्या भावनांचे दर्शन झाले. याठिकाणी पाचशे पेक्षा जास्त महिला कारागिर आहेत. मागील तीन वर्षांत ३ लाख लोकांना याद्वारे रोजगाराच्या संधी मिळाल्या.
- दिव्यांग असूनही चप्पल आणि डिटर्जेंट बनवणाऱ्या उत्तरप्रदेशातील सलमानची कहानी मोदींनी सांगितली. सलमनाने अनेक अडचणींवर मात करत हे काम सुरू केले. त्याच्याबरोबर आता ३० मुले काम करत आहेत. भविष्यात १०० जणांना रोजगार देण्याचा निश्चय त्याने केल्याचे मोदींनी सांगितले.
- जीवनामध्ये आवडीचे काम करतानाच साहसी बनण्याचे आवाहन मोदींनी केले.
- या आधी २६ जानेवारीला मन की बात कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना लोकांना नवनवे संकल्प करून देशाची सेवा करण्याचा आग्रह त्यांनी केला होता. भारतीय सर्व स्वप्नांना पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
- नव्या वर्षांत तुमच्या सर्वांचे आणि देशाचे संकल्प पूर्ण होतील, असे मोदी म्हणाले होते. पाणी वाचवण्याचे आवाहनही मोदींनी देशवासियांना केले होते. पाणी वाचण्यासंबधी करत असलेल्या प्रयत्नांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.