नवी दिल्ली : पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबरला ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश यांसह इतर चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यापूर्वी, ११ ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत, त्या राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध सूचनाही केल्या होत्या.
दरम्यान, ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या कोरोनावरील लसीची चाचणी भारतात सिरम इन्स्टिट्यूटद्वारे करण्यात येत आहे. या लसीच्या पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या पार पडल्या असून, आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आता सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा : 'कोव्हॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी सिरम इन्स्टिट्यूट सज्ज!