हैदराबाद - पंतप्रधान मोदींनी भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर काल(शुक्रवार) लडाखमधील भारताच्या निमू या सीमेवरील चौकीला भेट दिली. लष्कराचे मनोबल वाढविण्यासाठी मोदींनी लडाखला भेट देवून अप्रत्यक्षरित्या चीनच्या विस्तारवादी धोरणावर टीका केली. मात्र, मोदींनी भाषणात चीनचा नामोल्लेख टाळला. त्यावरून एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसींनी मोदींना फटकारले. भाषणात चीनचे नाव घेण्यात मोदींना संकोच कसला? असा सवाल त्यांनी केला.
'सीमेवरील आपल्या सैनिकांसह जखमी सैनिकांचीही तुम्ही भेट घेतली, हे चांगले केले. यामुळे सैनिकांचे मनोबल नक्कीच वाढेल. मोदी म्हणतात' मुहं तोड जवाव देणार' पण कोणाला ? चीनचे नाव घेण्यात संकोच का? शत्रु आपल्या घरात येऊन बसला आहे', असे ट्विट ओवैसी यांनी केले आहे.
ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींची एक व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे. भारतामध्ये कोणीही घुसले नाही, आणि कोणतीही चौकी घेतली नाही, असे मोदी या व्हिडिओत म्हणत आहेत. मात्र, ओवैसी यांनी यास मोठा मुर्खपणा म्हटले.
नियंत्रण रेषेवरील गलवान, हॉट स्प्रिंग आणि प्योंगयांग त्सो येथील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे संसदेचे अधिवेशन लवकर घेण्याची मागणी मी केली आहे. संसदेत सरकारला विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावे लागतील. भारतीय भूभाग बळकावल्याची जबाबदारी सरकारची आहे, असे ओवैसी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी सकाळी अचानक लडाख सीमा भागाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच सैनिकांचे मनोबल वाढविले. गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या सैनिकांचीही त्यांनी भेट घेतली. विस्तारवादाचे युग संपले असून आता विकासवादाचे युग सुरु असल्याचे मोदी चीनचे नाव न घेता म्हणाले. यावेळी मोदींसोबत लष्कर प्रमुख एम. एन नरवणे आणि सरसेनाध्यक्ष बिपीन रावत होते.