वायनाड - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळातील वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी येथे रोड शो केला. तेथे त्यांनी 'केरळ ही आमच्यासाठी वाराणसी असल्याचे' सांगणारा भाजप आणि मोदी खोटारडे असल्याचे म्हटले. तसेच, त्यांनी पंतप्रधान मोदींवर 'भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनाच प्राधान्यक्रम' देत असल्याचा आरोप केला.
'पंतप्रधान केरळला उत्तर प्रदेशइतके महत्त्व देत नाहीत, हे मला माहीत आहे. आमच्यासाठी आम्हाला मतदान करून जिंकून देणारे आणि जिंकून न देणारेही सारखेच आहेत. केरळही आमच्यासाठी वाराणसी आहे, असे मोदींनी शनिवारी म्हटले होते. त्यानंतर मोदी खोटारडे आहेत,' असे राहुल म्हणाले.'मोदींसाठी एकतर तुम्ही आरएसएसच्या विचारसरणीचा अवलंब करा नाहीतर तुम्ही भारतीय नाहीतच. आम्ही केरळवर नागपूरमधून राज्य करू देणार नाही. केरळवर केरळमधील लोकच राज्य करतील,' असे सांगत राहुल यांनी राजकीयदृष्ट्या आतापर्यंत भाजपपासून काहीशा अंतरावर असलेल्या केरळला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.एका बाजूला काँग्रेसचा पारंपरिक गड असलेल्या अमेठीमध्ये भाजपच्या स्मृती इराणींकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर केरळातील वायनाड मतदार संघाने राहुल गांधींची राजकीय कारकीर्द तारली आहे. राहुल यांनी येथील यूडीएफ नेत्यांचे राजकीय पाठबळासाठी आभार मानले आहेत. राहुल यांनी येथून ४ लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे.