नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांशी संवाद साधण्याची हातोटी सर्वपरिचित आहे. यामुळे भारतातील २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 'मोदी लाट' पाहायला मिळाली. तसेच, मोदी ट्विटर, इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असणारे समाजमाध्यमांवरूनही लोकांशी संवाद साधणारे 'टेक्नो सॅव्ही' नेते म्हणूनही ओळखले जातात. सध्या मोदींचे इन्स्टाग्रामवर तब्बल ३० दशलक्ष आणि ट्विटरवर ५० दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

मोदी सध्या इन्स्टाग्राम या फोटो-शेअरिंग अॅपवर जगातील सर्वांत जास्त फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत. मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनाही मागे टाकले आहे. इन्स्टाग्रामवर ट्रम्प यांचे १४.९ दशलक्ष तर, ओबामा यांचे २४.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवरून याविषयी ट्विट केले आहे. त्यांनी मोदी सध्या ट्रम्प आणि ओबामा यांच्यापेक्षाही जास्त लोकप्रिय ते बनल्याचे म्हटले आहे. हा मोदींचा लोकांमध्ये प्रभाव असल्याचा आणि युवकांशी संपर्कात असल्याचा आणखी एक पुरावा आहे, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

मोदी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते जिथे जातील, तिथले फोटो, विविध क्षण शेअर करत असतात. सध्या मोदी सोशल मीडियावरील लोकप्रियतेच्या बाबतीत जगातील नेत्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
गॅलप इंटरनॅशनलने यंदाच्या वार्षिक सर्वेक्षणात मोदी जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. ५० देशांमधील नेत्यांदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मार्केल पहिल्या स्थानावर आहेत. तर, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन दुसऱ्या स्थानवर आहेत. यामध्ये चीनचे झी जिनपिंग,रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे, इस्रायलचे बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह इतर अनेकांचा समावेश आहे.