विजयवाडा - एका महिलेनं राज्यपालांना पत्र लिहून आपल्या मुलीच्या इच्छा मरणाची मागणी केली आहे. दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीचा उपचार करण्यास सरकारी डॉक्टरांनी नकार दिल्यामुळे त्यांनी वैतागून ही मागणी केली.
दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीचे नाव जान्हवी आहे. तिच्यावर एका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर जान्हवीची आई स्वर्णलता यांनी राज्यापालांना पत्र लिहून मुलीच्या इच्छा मरणाची मागणी केली. आंध्रप्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यातील सिंग नगरमध्ये हे कुटंब राहते.
इच्छा मृत्यूपत्र म्हणजे काय?
मरणासन्न स्थितीत पोहचल्यावर किंवा शरीर उपचाराला साथ देत नसेल तर कोणत्या पद्धतीने उपचार केले जावेत अथवा करू नयेत, याबाबत एखादी आजारी व्यक्ती त्याची इच्छा मृत्यूपत्रात नमूद करू शकते. एखादी मरणासन्न व्यक्ती मृत्यूच्या दारात पोहचल्यास त्याच्यावरील उपचार बंद केले जातात. त्याला इच्छा मृत्यू ( पॅसिव्ह इथुनेशिया) असं म्हटलं जातं.