नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवरील फिंगर फोर भागामध्ये चीनी सैन्याने ठिकठिकाणी लाऊडस्पीकर लावले आहेत. विशेष म्हणजे, या लाऊडस्पीकरवरुन चीनी सैनिक चक्क पंजाबी गाणी मोठ्याने वाजवत आहेत. ही चीनची नवी खेळी असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे चीनने सिमेवर गाणे वाजवल्याचा प्रकार घडला होता.
अरुणाचलमधील तणावपूर्ण परिस्थिती असेलेल्या छोट्टा किल्ला येथील सिमा भागात भारतीय सैनिक गस्त घालत होता. तेव्हा त्याला अचानक भारतीय गाण्यांचा आवाज ऐकायला आला. परदेसी-परदेसी हे हिंदी गाणे दोन चीनी सैनिक मोठ्याने वाजवत होते. ही घटना काही वर्षांपूर्वी असल्याचे एका लष्कारातील सैन्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले.
चीन सीमेवर शांतता ठेवण्यासाठी आपण पुढाकार घेत असल्याचे दर्शवतो. मात्र, सीमेवर त्यांच्या सैनिकांची कृत्ये त्याच्या उलट असतात. आता सिमेवर गाणे वाजवून चीन भारतीय जवानांना उकसवण्या प्रयत्न करत आहेत. मात्र, भारतीय सैनिकांना मानसिकरित्या त्रास देऊन लक्ष विचलीत करण्याचा चीनचा हा प्रयत्न व्यर्थ ठरणार आहे. कारण, चीनला काय साध्य करायचे आहे, हे भारतीय सैनिक जाणून आहेत. चीन केवळ भारतीय संगीताची लोकप्रियता अधोरेखित करत आहे, असे ते म्हणाले.
अशा गोष्टीमुळे आपले लक्ष विचलित होईल किंवा मनोबल कमी होईल, अशी कल्पना करणे त्यांच्यासाठी मूर्खपणाचे आहे. आपल्याकडे लढाईसाठी कठोर आणि देशावर प्रेम असलेले सैनिक आहेत. ते सियाचीन येथे अति उंच ठिकाणी दक्ष राहत आहेत. पीएलएच्या सैनिकांना लढाईचा सक्रिय अनुभव नाही, असेही त्यांनी सांगितले.
युद्धासाठी तार्किकदृष्ट्या देखील आपण तयार आहोत. पाण्याचा साठा, इंधनाचा साठा, टाक्या व शस्त्रास्त्र, वाहनांसाठी सुटे भाग, थंड ठिकाणात राहण्यासाठी उबदार खोल्या, पुरेसा दारूगोळा , वैद्यकीय सुविधा, आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. चीनी सैनिक हे बहुतेक शहरी भागातील असून त्यांना कठीण वातावरण असेल्या ठिकाणावर दीर्घ काळ तैनात राहण्याची सवय नाही. वृत्तानुसार, चीनी सैनिक ‘psy-ops’ या पुस्तकातील युक्ती वापरून भारतीय सैनिकांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, चीनी सैन्यांचे हातखंड्याचा भारतीय सैन्यावर काहीही परिणाम होणार नाही.
सीमेवर असलेल्या तणाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. फिंगर फोर परिसरात आठ सप्टेंबरला दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. चीनी सैन्याने भारतीय सैनिकांना उकसवण्यासाठी जाणीवपूर्वक हवेत गोळीबार केल्याचे लष्कराने स्पष्ट केले होते. अशाच प्रकारच्या आणखी दोन घटना 29 ते 31 ऑगस्टलाही झाल्या होत्या. सिमेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशादरम्यान चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत. मात्र, चीनच्या आडमुठेपणामुळे परिस्थीती आणखी बिघडत चालली आहे.