गुंटूर (आंध्र प्रदेश) - येथील माछावरम मंडळातील पिल्लुतला गावच्या लोकांनी मंगळवारी उघडलेल्या दारूच्या दुकानासमोर आंदोलन केले. या लोकांनी हे दुकान बंद करण्याची जोरदार मागणी केली. तिसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर करताना शासनाने व्यवसायांना काही प्रमाणात सूट दिली आहे. मात्र, यानंतर दारूचे दुकान सुरू झाल्यानंतर लोकांनी याला एकजुटीने विरोध केला. या वेळी, ग्रामस्थांनी प्रकरण नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांशीही जोरदार वादावादी केली.
पिल्लुतलामधील ग्रामस्थ दारूचे दुकान बंद करण्याच्या मागणीवर ठाम होते. कोरोना विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्थितीत गावात दारूचे दुकान सुरू होणे धोकादायक ठरू शकते. येथे दारू खरेदी करण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधूनही लोक येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती येथील स्थानिक जनतेने व्यक्त केली.
कोविड - 19 लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने दुकाने उघडण्यासाठी शिथिलता दिल्यानंतर दारूची दुकाने उघडण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झालीआहे. हे लक्षात घेऊन आंध्रप्रदेश सरकारने मंगळवारी दारूच्या किंमतीत 50 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. याच्या आदल्या दिवशीच सरकारने या किमती 25 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. 'अल्कोहोलच्या सेवनाला परावृत्त' करण्याच्या दिशेने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दारूच्या दरांमध्ये एकूण 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे.