नवी दिल्ली - कोरोनामुळे भारताचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीला चीन जबाबदार असून भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीनकडे ६०० अब्ज डॉलरची नुकसानभरपाई मागावी, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला यासंबधी निर्देश द्यावे असेही याचिकेत म्हटले आहे.
के. के. रमेश यांनी ही याचिका दाखल केली आहे. कोरोना विषाणू चीनमधील विषाणू संस्थेत निर्माण करण्यात आला. तेथूनच त्याचा जगभर प्रसार झाला आणि लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. यास अनेक पुरावे आहेत, असे के. के. रमेश यांनी म्हटले.
१९८४ साली झालेल्या जैविक शस्त्र परिषद झाली होती. त्यात जैविक शस्त्रांची निर्मिती आणि साठवणूक करणार नसल्याचे चीनने मान्य केले होते. या नियमांचे चीनने उल्लंघन केले आहे. कोरोनामुळे अनेक भारतीय नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असून लोकांना खायला-प्यायलाही मिळत नाही, नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
जगभरात कोरोनाची ३९ लाख नागरिकांना लागण झाली असून दोन लाख ७० हजारांपेक्षाही जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोट्यवधी नागरिकांना कोरोनामुळे जीवावरचा धोका निर्माण झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्था कोरोनामुळे डबघाईला आली आहे.