नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील हाथरसमधील तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. ज्यापद्धतीने पोलिसांनी पीडितेच्या कुटूंबाच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अंतिम संस्कार केले त्यानंतर लोकांमध्ये उद्विग्न प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दुसरीकडे या प्रकरणी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष पथकाच्या माध्यमातून करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या निरीक्षणाखाली करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिल्लीतील सामाजिक कार्यकर्त्या सत्यमा दुबे, विकास ठाकरे, रुद्र प्रताप यादव आणि सौरभ यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे, की उत्तरप्रदेशमध्ये प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होणार नाही त्यामुळे या प्रकारणाचा तपास दिल्लीकडे वर्ग करावा.
हाथरस घटनेनंतर देशभरातून उत्तर प्रदेश सरकारविरुद्ध संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून पीड़ितेच्या कुटूंबीयांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना केली असून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर खटला चालवण्यासाठी एका फास्ट-ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी दिल्ली महिला आयोग व तेहसीन पुनावाला यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठवले आहे.