नवी दिल्ली - भारतीय बनावटीच्या कोरोना लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी आज(शुक्रवार) सुरु करण्यात आली आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स(एम्स) मध्ये ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु झाली आहे. आज एका 30 वर्षीय व्यक्तीला लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
मागील आठवड्यापासून क्लिनिकल ट्रायलसाठी एम्स रुग्णालयात साडेतीन हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. यातील 22 जणांची शारिरीक तपासणी सुरु करण्यात आली आहे, असे एम्स रुग्णालयातील लसीच्या अभ्यासाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी सांगितले.
पहिला स्वयंसेवक हा दिल्लीतील रहिवासी आहे. त्याच्या आधी सर्व शारिरीक चाचण्या करण्यात आल्या असून तो ठीक आहे. त्याला दुसरा कोणताही शारिरीक त्रास नाही. दुपारी दीडच्या दरम्यान या स्वयंसेवकाला 0.5 एम. एलचे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देण्यात आले आहे. त्याच्यावर पुढील सात दिवस लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे राय यांनी सांगितले. तसेच आणखी स्वयंसेवकाच्या शारिरीक चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना लस देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
देशातील 12 वैद्यकीय संस्थांमध्ये कोव्हॅक्सिन लसीची ट्रायल करण्यास आयसीएमआरने परवानगी दिली आहे. यातील दिल्लीतील एम्स रुग्णालय आहे.
पहिल्या टप्प्यात 375 स्वयंसेवक
लसीच्या पहिल्या टप्प्यात 375 स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे. यातील 100 जण दिल्लीतील एम्समधील असतील. पहिल्या टप्प्यात 18 ते 55 वयोगटातील स्वस्थ व्यक्तींना लस देण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तीला दुसरी शारिरीक व्याधी नाही. तसेच गर्भवती नसलेल्या महिलांनाही चाचणीत समाविष्ठ करुन घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 12 ते 65 वयोगटातील 750 जणांना लसीचा डोस देण्यात येणार आहे.
कोव्हॅक्सिन ही कोरोनावरील लस हैदराबादमधील भारत बोयोटेक कंपनी, राष्ट्रीय विषाणू संस्था(एनआयव्ही) आणि आयसीएमआरच्या सहकार्याने तयार करण्यात येत आहे. नुकतेच या लसीची मानवी चाचणी घेण्यास औषध महानियंत्रणाची परवानगी मिळाली आहे. 15 ऑगस्टपर्यंत लस तयार करण्याचे लक्ष आयसीएमआरने ठेवले आहे. या निर्णयावर टीकाही झाली. मात्र, देशातील कोरोनाचे रुग्ण पाहता लस वेगाने तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.