नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन अनलॉक झाल्यानंतर इंधनाच्या दरात रोज वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोल 76.26 रुपये प्रति लिटर तर डिझेल 74. 62 रुपये प्रति लिटर झाले आहे. गेल्या आठवड्यापासून इंधनदरात वाढ होत असून आज आठवड्याच्या सुरुवातीलाच पेट्रोलमध्ये 48 पैसे तर डिझेल दरात प्रति लिटर 59 पैशांनी वाढ झाली आहे.
सलग नवव्या दिवशी दरवाढ-
रविवार दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 62 पैशांची तर डिझेलमध्ये प्रति लिटर 64 पैशांनी वाढ झाली होती. त्यानंतर आज सलग नवव्या दिवशी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. या 9 दिवसात पेट्रोल 5 रुपये 33 पैसे प्रतिलीटर तर डिझेल प्रतिलिटर 5 रुपये 15 पैशांनी महाग झाले आहे. स्थानिक विक्री कर अथवा व्हॅटमुळे देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या दरवाढीचा सामान्य नागरिकांना ही फटका बसणार आहे. कोरोनामुळे बेजार झालेल्या नागरिकांना महागाईची झळ बसू शकते.