राजकोट - काँग्रेसमधून राजीनामा देत भाजपामध्ये जाणाऱ्या आमदारांना लोकांनी चपलांनी मार दिला पाहिजे, असे मत काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केले आहे. गुजरातमध्ये येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पटेल यांनी असे म्हटले आहे.
मागील महिन्यात भाजपा हे घोडाबाजार करण्यात व्यग्र होते. त्यांनी सुमारे १५० कोटी रुपये खर्च केले. हेच पैसे त्यांनी आमदार विकत घेण्यासाठी न वापरता व्हेंटिलेटर्स विकत घेण्यासाठी वापरले असते, तर आपण काही लोकांचे प्राण नक्कीच वाचवू शकलो असतो. यामध्ये भाजपासोबत त्या काँग्रेस नेत्यांचीही चूक आहे, जे पैशासाठी भाजपामध्ये जात आहेत. लोकांचा विश्वासघात करणाऱ्या अशा नेत्यांना लोकांनी चपलांनी मारायला हवे, असे मत पटेल यांनी व्यक्त केले.
ऐन निवडणूकीपूर्वीच हे नेते राजीनामा का देत आहेत? याकडे निवडणूक आयोगही डोळेझाक करत आहे. भाजपा केवळ बहुमत मिळवण्यासाठी हे करत आहे, मात्र आम्ही राज्यसभेच्या दोन जागा नक्कीच जिंकू, असा विश्वासही पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.
१९ जूनपासून होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन काँग्रेस नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या २२ आमदारांना राज्यातील आणि राजस्थानमधील हॉटेलांमध्ये ठेवले आहे.
हेही वाचा : गुजरातमधील राज्यसभेची दुसरी जागा जिंकण्यासाठी एका मताची गरज; काँग्रेसचा दावा