बडवाणी (मध्य प्रदेश) - कोरोना विषाणुमुळे देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात आंदोलन केले.
कोणतेही नियोजन न करता देशात निर्बंध लादले गेले आहेत. या कठीण परिस्थितीतही राज्ये व केंद्र यांच्यात समन्वय नसल्याचा आरोप नर्मदा बचाओ आंदोलनकर्त्या मेधा पाटकर यांनी केला.
मजूर पगार न घेताच घरे सोडून आपापल्या राज्यात परत गेले आहेत. त्यांना जगण्यासाठी मोफत किंवा माफक दरात धान्य द्यायला पाहिजे, अशी मागणी पाटकर यांनी केली.
अडकलेले स्थलांतरीत कोणत्याही मदतीशिवाय राष्ट्रीय महामार्गांवरून चालत आहेत. त्यांना कोणतीच वाहने उपलब्ध करून देण्यात आली नाही. ज्या सोयी-सुविधा इतर राज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत आहेत. त्या सुविधा या मजुरांना पुरविण्यात याव्यात, मात्र एवढी साधी समज या देशातील लोकांमध्ये नाही, अशी टीका पाटकर यांनी केली.
या मुद्द्यावर सामाजिक संघटनांनी अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करण्याचे आवाहन मेधा पाटकर यांनी केले आहे. तसेच पीएम केयर फंडमधून या मजुरांना मदत देण्यात यावी, अशी मागणी मेघा पाटकर यांनी केली आहे.