हरिद्वार : कोरोनावरील औषध म्हणून बाजारात आणलेल्या 'कोरोनील'बाबत पतंजलीने आता घूमजाव केले आहे. हे औषध कोरोनावरील नसून, केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आहे, असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.
पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, आम्ही कोरोनावर औषध शोधल्याचा दावा कधीही केला नव्हता. आमच्या कंपनीने रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध बनवण्यासाठी परवाना घेतला होता. दिव्य स्वासरी वटी, दिव्य कोरोनील टॅबलेट आणि दिव्य अणु तेल ही सर्व केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असलेली औषधे आहेत. ते पुढे म्हणाले, की या औषधावरुन सुरू असलेला सर्व गदारोळ हा केवळ माझी बदनामी करण्यासाठी सुरू आहे. आम्ही या औषधाच्या चाचण्या पुन्हा करण्यासाठी तयार आहोत. एनआयएमएस विद्यापीठाने या औषधाची चाचणी करताना कोणत्याही नियमांचा भंग केला नाही. तसेच आम्हीही कोणताही खोटा दावा केला नाही.
यावर प्रतिक्रिया देताना उत्तराखंड आयुर्वेद विभागाचे परवाना अधिकारी वाय. एस. रावत म्हणाले, की पतंजलीने कोरोना विषाणूचे प्रतिकात्मक छायाचित्र आपल्या कोरोनील औषधाच्या बॉक्सवर छापले आहे. मात्र, आम्ही नोटीस बजावल्यानंतर कंपनीने असे काही छापले नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, बाबा रामदेव यांनी गेल्या आठवड्यात कोरोनील औषध लाँच केल्यानंतर काहीच तासात ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आयुष मंत्रालयाने कोरोनीलची जाहिरात व प्रसिद्धी थांबविण्याचे आदेश पंतजलीला दिले. तसेच पतंजलीकडून कोरोनाच्या औषधाबाबत सविस्तर माहितीही आयुष मंत्रालयाने मागविली. यासोबतच रामदेव, बाळकृष्ण आणि इतर तीन जणांवर जयपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला होता.
हेही वाचा : आता पेटीएम बंद करण्याचे धाडस दाखवा; काँग्रेस नेत्याचे मोदींना आव्हान..