हरिद्वार - जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक कंपन्या तसेच संशोधक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पतंजली ट्रस्टने कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे.
कोरोनावर लस शोधल्याचा दावा पतंजली ट्रस्टचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे. पतंजली रिसर्चकडून कोरोना लसीवर संशोधन सुरु होते. त्यात यश आल्याची माहिती ट्रस्टने दिली आहे. या लसीमुळे 1 हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.
कोरोना लसीचे क्लिनिकल अहवाल हाती आले आहेत. दरम्यान, क्लिनिकल कंट्रोल अहवालाची वाट पाहत आहोत. त्यानंतर जागतिक मानकांत पात्र ठरल्यानंतर कोरोनावर अधिकृत लस शोधल्याचे घोषित करण्यात येईल, असे पतंजली आयुर्वेदाचे कार्यकारी संचालक आचार्य बालकृष्णा यांनी सांगितले.
पंतजली रिसर्चचे अनेक वैज्ञानिक रात्रंदिवस लस शोधण्यासाठी काम करत होते, असे बालकृष्ण यांनी सांगितले. विविध ठिकाणांवरील कोरोनाग्रस्तांना ही लस देण्यात आली. यातील 80 टक्के रुग्ण पुर्णत: बरे झाल्याचे त्यांनी सांगितले.
जगभरात कोरोनावर लस शोधण्यासाठी संसोधन आणि क्लिनिकल ट्रायल घेण्यात येत आहेत. काही देशांत लस विकासाच्या दुसऱया टप्प्यात आली आहे. तर काही चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत त्यांचे अहवालही येतील. मात्र, त्याआधीच कोरोनावर लस शोधल्याचा दावा पतंजलीने केला आहे.
‘वुहानमध्ये पहिला रुग्ण सापडल्यापासूनच संशोधन सुरु’
पतंजली रिसर्च इन्स्टिट्युटकडून चीनमधील वुहानमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतरच संसोधन सुरु करण्यात आले आहे. आत्तापर्यंत लसीचा निकाल 100 टक्के आहे. विविध वैज्ञानिकांनी यावर काम केले आहे. अमेरिका, जर्मनी आणि सिंगापूरचे वैज्ञानिकही लस बनण्यासाठी आमच्यासोबत काम करत असल्याचे बालकृष्ण यांनी सांगितले.