रायपूर - गुवाहाटीहून मुंबईला जाणारे स्पाइसजेटचे विमान क्रमांक 6481 रायपूरमध्ये आपात्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आले. प्रवासी जितेंद्र शिंदे यांना हृदयाचा त्रास झाल्याने त्यांना विमानातून उतरवून उपचार करण्यासाठी विमानाचा रस्ता बदलून ते रायपूरला उतरवण्यात आले.
हे विमान दुपारी सव्वादोनला रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरवण्यात आले. विमानाचे लँडिंग होताच तेथे आधीच उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून शिंदे यांना ताबडतोब मेकाहारा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. शिंदे हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील सांगली पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी होते. त्यांचे वय ३२ सांगण्यात येत आहे.
मृत्यूचे कारण अस्पष्ट, उद्या होणार शवविच्छेदन
जितेंद्र शिंदे यांना हृदयाची गती कमजोर झाल्याने विमान आपात्कालीन परिस्थितीत उतरवून (ईमर्जन्सी लँडिंग) मेकाहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेकाहाराच्या प्रवक्त्या शुभ्रा ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र यांना मृतावस्थेतच रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांचे बंधू सूरज अशोक शिंदे मेकाहारा येथे पोहोचले आहेत. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून उद्या शवविच्छेदनानंतर ते स्पष्ट होईल, असे त्या म्हणाल्या.
विमानाचे रात्री ९ वाजता उड्डाण
विमानाचे रायपूर येथे आपात्कालीन परिस्थितीत लँडिंग झाल्यानंतर विमानाने रात्री ९ वाजता पुन्हा आकाशात उड्डाण केले. ईमर्जन्सी लँडिंगनंतर पुन्हा उड्डाण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा रायपूर विमानतळावर उपलब्ध नव्हती. दुसऱ्या विमानाने ती उपलब्ध केल्यानंतर विमानाने पुन्हा उड्डाण केले.