श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पूंछ जिल्ह्यातील सीमाभागात पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यासोबतच काही ठिकाणी हँड ग्रेनेडही फेकण्यात आले. लष्कराच्या एका प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली.
या हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या महिन्यातच पाकिस्तानने तब्बल २६ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. एक ऑक्टोबरला यामध्ये एक जवान हुतात्मा झाला होता, तर आणखी एक जवान जखमी झाला होता.
सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ४२७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन
संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे ४२७ वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ मार्चमध्ये ४११, तर ऑगस्टमध्ये ४०८ वेळा आणि जुलैमध्ये ३९८ वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.
यावर्षी तब्बल ३ हजार ८०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन
यावर्षी पाकिस्तानने ३ हजार ८०० वेळा गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हटले. अनेक वेळा दहशतवाद्यांनी सीमेवर शस्त्रात्रे ठेवली. अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यास पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करत असून सीमेवर सगळ्या ठिकाणी पाकिस्तानच्या कारवाया सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
हेही वाचा : बिहार निवडणूक : 'दहा लाख नोकऱ्यांचे आश्वासन देणारे स्वत: बेरोजगार'