नवी दिल्ली - केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये सीमावर्ती भागात वाढलेल्या चकमकींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी चर्चा करावी, असे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले होते. यावरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी अब्दुल्ला यांना फटकारले.
'भारत नेहमीच संवाद आणि शांततेला पाठिंबा देणारा आहे. परंतु पाकिस्तानने नेहमीच फसवणूक केली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चर्चेला सुरुवात केली होती. हे त्यांनी (अब्दुल्ला यांनी) लक्षात ठेवले पाहिजे. (पाकिस्तानचे माजी अध्यक्ष) परवेझ मुशर्रफही भारतात आले आणि त्या बदल्यात भारताला काय मिळाले,' असा सवाल आठवले यांनी केला आहे.
हेही वाचा - कोडियालातला 'कांची साडी' उद्योग कोरोनामुळे संकटात, 10 हजार लोकांच्या रोजगाराचा प्रश्न
'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014मध्ये शपथविधी समारंभात पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आमंत्रित केले होते. त्याद्वारे त्यांनी स्पष्ट संदेश दिला होता की, संवादाच्या माध्यमातून भारताला शांतता आणि प्रगती हवी आहे. पण त्या बदल्यात काय मिळाले?' असा सवाल त्यांनी केला. 'सरकार वाटाघाटी करण्यास तयार आहे आणि जम्मू-काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग असल्याने पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावा,' असे आठवले म्हणाले यांनी सांगितले.
'जम्मू-काश्मीरमध्ये सीमासंघर्षात वाढ झाली आहे आणि पाकिस्तानशी चर्चा झाली पाहिजे,' असे अब्दुल्ला यांनी शनिवारी लोकसभेमध्ये शून्य तासादरम्यान झालेल्या चर्चेत म्हटले होते.
अब्दुल्ला यांनी त्यांची सुटका करण्याची मागणी करणाऱ्या सदस्यांचे आभार मानले. मागील वर्षी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद 370 रद्द करण्यात आल्यानंतर आणि राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी झाल्यानंतर त्यांना अन्य राजकीय नेत्यांसमवेत शांततेच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले होते.
हेही वाचा - ईशान्य भारतात शस्त्राऐवजी आता सोने अन् सुपारीची तस्करी!
लोकसभेत अब्दुल्ला यांनी नवीन तयार झालेल्या केंद्रशासित प्रदेशात 'प्रगती होत नसल्याचा' दावा केला. तसेच, 4 जी नेटवर्क नसल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला, असे ते म्हणाले. सर्व काही इंटरनेटवर होते आणि या भागातील इंटरनेट सेवा बंद होती. यामुळे मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये अडचणीही येत होत्या, असे ते म्हणाले. सीमेवर तणाव आणि चकमकी वाढत आहेत. लोक मरत आहेत. यावर चर्चेशिवाय तोडगा निघणार नाही, असे ते म्हणाले.