इस्लामाबाद - पाकिस्तानने 1 हजार 210 मोस्ट वाँडेट दहशतवाद्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आंतकवाद्यांचा समावेश आहे. ही यादी केंद्रीय तपास संस्थेच्या (एफआयए) दहशतवादीविरोधी पथकाने जारी केली आहे. या यादीत लंडनमध्ये वास्तव्यास असलेले मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) चे नेता अल्ताफ हुसैन आणि मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे कार्यकर्ता नासिर बट्ट यांचाही समावेश आहे.
2008 मुंबई हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची नावे आणि त्यांचे पत्तेही या सुचीत आहेत. तसेच एखाद्या दहशतवाद्यांवर बक्षिस जाहीर असेल, तर त्याबाबतही माहिती देण्यात आली आहे. तसेच माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ आणि पंतप्रधान शौकत अजीज यांच्यावर हल्ला केलेल्या संशयितांची नावे ही यादीत आहेत.
मुख्य सुत्रधारांची नावे पाकिस्तानने वगळली -
दहशतवाद्यांना काळा पैसा पुरवत असल्याचे म्हणत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कृती दलाने (एफटीए) करड्या यादीत ठेवले आहे. या यादीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. पाकिस्तानने जारी केलेल्या यादीत मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सुत्रधारांची नावे नाहीत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 26/11 चा दहशतवादी हल्ल्याचे नियोजन पाकिस्तानात करण्यात आले, तेथूनच या हल्ल्याची सर्व सुत्रे हलली, ही वस्तुस्थिती आहे. या यादीतून दिसून येते की पाकिस्तानकडे हल्लेखोरांची सर्व माहिती आहे, असे श्रीवास्तव म्हणाले.