नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र संघाच्या इतर दक्षिण आशियाई क्षेत्र सहयोग संघटनेत (SAARC) परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या उद्घाटन संबोधनावर बहिष्कार टाकला आहे. काश्मीरमधील 'बंदी' संपेपर्यंत भारताशी संपर्क साधणार नाही, असे कुरेशी म्हणाले आहेत.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी कार्यक्रमापासून दूर राहिले. भारतीय मंत्र्याचे भाषण संपताच कुरेशी बैठकीत पुन्हा सहभागी झाले. गेल्यावर्षी परिषदेमध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमुद कुरेशी हे उपस्थित होते. बैठकीत सुषमा स्वराज यांनी भाषण केलं. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री उभे राहिले त्यांचं भाषण होण्यापूर्वीच सुषमा स्वराज तिथून निघून गेल्या होत्या.
भारत सरकारने ५ ऑगस्टला जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानाच्या अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र पाकचे नापाक मनसुबे धुळीस मिळाले आहेत. दरम्यान अनुच्छेद ३७० हटविणे हे आमचे अंतर्गत प्रकरण असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
‘सार्क’मध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे. या परिषदेत सार्कच्या सदस्य राष्ट्रांनी नियमित एकत्र येणे अपेक्षित असताना ३२ वर्षांत फक्त १८ वेळा ते एकत्र आले आहेत. २०१६ मध्ये पाकिस्तान येथे होणारी १९ वी शिखर परिषद भारतासह बांग्लादेश, भूतान, अफगाणिस्तान यांनी बहिष्कार टाकल्याने रद्द झाली. याला उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी होती.