चंदीगड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्व व्यवहारही ठप्प आहेत, यामुळे अनेक नागरिकांवर उपासमारीची परिस्थिती ओढावली आहे. अशाच अडचणीत सापडलेल्या पंचकुला येथील एका चित्रकाराने घराच्या भिंतीवर 'हेल्प अस' असे लिहून मदतीची विनंती केली आहे.
पवन कुमार असे या कलाकाराचे नाव असून ते वाहनांच्या नंबर प्लेट आणि बाह्यभाग सुशोभित करण्याचे काम करतात. लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून कुमारला कामावर जाता आले नाही. दरम्यानच्या काळात स्वत:जवळील सर्व पैसे संपल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून मी घराच्या भिंतीवर अक्षरं रंगवून लोकांना मदत करण्याची विनंती केली, असे कुमार यांनी सांगितले.
कुमार यांनी मदत गोळा करण्यासाठी घराच्याबाहेर एक बॉक्सही ठेवला आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही त्यांना आवश्यक ती मदत केलेली नाही. फक्त एक गोणी गव्हाचे पीठ दिले आहे. मात्र, इतर कुठलेही साहित्य नसताना फक्त पीठापासून जेवण कसे बनवणार असा प्रश्न कुमार यांनी उपस्थित केला आहे.