चेन्नई - लेबनॉनची राजधानी बैरुत येथे बंदरावर झालेल्या शक्तीशाली स्फोटाने संपूर्ण जग हादरले आहे. बंदरावर ठेवलेल्या धोकादायक अशा अमोनियम नायट्रेट या केमिकलचा स्फोट झाल्याने शेकडो जण ठार झाले असून हजारो नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील बंदरांची प्रशासनाकडून झाडाझडती घेण्यात येत आहे. दरम्यान, तामिळनाडूतील चेन्नई शहराजवळील मनाली या ठिकाणी गोदामात तब्बल 740 टन अमोनियम नायट्रेट हे धोकादायक केमिकल साठवून ठेवल्याचे समोर आले आहे. बैरुतमधील स्फोटास जबाबदार असलेले हे अमोनियम नायट्रेट भारतातही विध्वंस घडवू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सीमा शुल्क विभागाने 2015 साली करुर येथील एका केमिकल कंपनीने आयात केलेले अमोनियम नायट्रेट क्लिअरन्ससाठी ताब्यात घेतले होते. अवैधरित्या आयात केल्याचे आढळून आल्याने सर्व माल चेन्नईपासून जवळील मनाली येथील सीमा शुल्क विभागाच्या गोदामात खाली करण्यात आला होता. तब्बल 37 कंटेनरमध्ये हा माल ठेवण्यात आला आहे. यासंबंधी सीमा शुल्क विभागातील सुत्रांनी सांगितले की, धोकादायक माल बिगर रहिवासी भागातील गोदामात ठेवण्यात आला असून, सुरक्षेच्या सर्व उपाययोजना घेण्यात येत आहेत. मात्र, बैरुत येथील स्फोटानंतर सीमा शुल्क विभागाचे धाबे दणाणले आहेत.
या अवैध मालाप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयात खटला दाखल आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व मालाचा ई- लिलाव करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. सर्व माल आता लिलाव प्रक्रियेत आहे, असे सीमा शुल्क विभागातील सुत्रांनी सांगितले. मात्र, बैरुत येथील घटनेनंतर प्रशासनाने धडा घेवून या धोकादायक केमिकल्सची विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.
काय आहे अमोनियम नायट्रेट
अमोनियम नायट्रेट हा ज्वालाग्राही पदार्थ असून उद्योगांमध्ये त्याचा वापर कऱण्यात येतो. खते आणि स्फोटके बनविण्यासाठी याचा वापर होता. खाणकाम क्षेत्रात स्फोट करण्यासाठीही याचा वापर होता. अमोनियम नायट्रेट स्वत: होऊन पेट घेत नसले तरी ज्वालाग्राही पदार्थांच्या संपर्कात आल्याने मोठा स्फोट होऊ शकतो.