नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील सरकारी रुग्णालयात ३६ हजार व्हेंटिलेटरचे वाटप केले आहे. या व्हेंटिलेटरची सरासरी किंमत २ ते १० लाखांच्या दरम्यान आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर देशांतर्गत उद्योगांना आरोग्य उपकरणे बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. हे सर्व व्हेंटिलेटर देशी बनावटीची आहेत.
मेक इन इंडिया व्हेंटिलेटर -
कोरोनाचा प्रसार होण्याआधी देशातील सरकारी रुग्णालयात फक्त १६ हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होते. मात्र, १२ महिन्यांपेक्षा कमी काळात ३६ हजार ४३३ मेक इन इंडिया व्हेंटिलेटर तयार करण्यात आले. व्हेंटिलेटर निर्यातीवरील सर्व निर्बंध केंद्र सरकारने काढून घेतले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील साहित्य पुरवठ्यात या वर्षी भारताने मोठी प्रगती केल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले.
आरोग्य साहित्याचा बफर साठा वाढला-
देशात महामारीचा प्रसार झाल्यानंतर व्हेंटिलेटरसाठी भारत पूर्णत: आयातीवर अवलंबून होता. यासोबतच पीपीई किट, एन-९५ मास्क आणि इतरही अनेक उपकरणे परदेशात मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत होती. आरोग्य उपकरणांच्या निर्मितीबाबत आधी कोणताही प्रमाणित पद्धत नव्हती, असे मंत्रालयाने म्हटले. व्हेंटिलेटरसोबतच पीपीई किटचेही भारातने मोठे उत्पादन केले आहे. मार्च महिन्यात भारतात २ लाख अतिरिक्त पीपीई कीटचा साठा होता. तो आता वाढून ८९ लाख झाला आहे. मागील नऊ महिन्यात पीपीई कीटची सरासरी किंमत सहाशे रुपयांवरून २०० रुपयांवर आली आहे.
नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य उपकरणाचा पुरवठा
भारतामध्ये नव्या कोरोना विषाणूचे २५ रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवा विषाणू सापडला असून त्यामुळे पुन्हा एकदा सगळीकडे भीत पसरली आहे. २५ पैकी २० जण म्युटेट स्ट्रेनचे बाधित असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना केंद्राच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.