हैदराबाद - बालकांच्या लसीकरणाबाबत युनिसेफच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 1 कोटी 30 लाख बालकांचे 2018 या वर्षात लसीकरण झाले नाही. प्रामुख्याने कमकुवत आरोग्य व्यवस्था असलेल्या देशांमध्ये लसीकरण झाले नाही. त्यात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जागतिक लसीकरण कार्यक्रमात अडथळा येण्याची शक्यता आहे, याबबातचा इशाराही संघटनेने दिली आहे.
गोवर आणि पोलिओ या आजारांवरील लस अजूनही 2 कोटी बालकांना (1 वर्षाखालील) मिळाल्या नाहीत. कोरोनाचा प्रसार होण्याआधीची ही परिस्थिती आहे. महत्त्वाचा लसीकरण कार्यक्रम आधीच संथ गतीने सुरु आहे.
कोरोनाचा प्रसार जगभरात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात लहान बालकांचे लसीकरण करणे ही अतिमहत्त्वाचे काम आहे, असे युनिसेफचे प्रमुख सल्लागार आणि लसीकरण कार्यक्रमाचे प्रमुख रॉबिन नंदी यांनी सांगितले. कोरोनामुळे लसीकरण कार्यक्रमात अडथळा आला आहे, त्यामुळे अनेक बालकांचे भवितव्य अधांतरी आहे.
फक्त गरीब देश नाही तर प्रगत देशांतही काही भागांमध्ये लसीकर मंदावले आहे. 2019 साली उच्च उत्पन्न असलेल्या अमेरिका, इंग्लड आणि फ्रान्स या देशातील काही भागांमध्ये गोवरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. गरीब देशांमधील लसीकरणाची परिस्थिती यापेक्षा भयंकर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
2010 ते 2018 या वर्षात इथियोपिया या देशातील 1 वर्षाखालील 1 कोटी 90 हजार बालकांना गोवरची लस मिळाली नाही. तर डेमोक्रटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशात 60 लाख 20 हजार, अफगाणिस्तान 30 लाख 80 हजार तर चाड, मादागास्कर, युगांडा या देशात प्रत्येकी 20 लाख 70 हजार बालकांचे लसीकरण झाले नाही, असे अहवालात म्हटले आहे.