पुणे - पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीला पुण्याच्या कर्ज वसुली न्यायाधीकरणाने (डीआरटी) दणका दिला आहे. ७३०० कोटी रुपये व्याजासह पीएनबी बँकेला परत करण्याचे आदेश न्यायाधीकरणाने मोदीला दिले आहेत.
पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांच्या न्यायाधीकरणाने मोदींना ७३०० कोटी रुपये व्याजासह पीएनबी बँकेला परत करण्याचे आदेश दिले आहेत. नीरव मोदी भारतातील पीएनबी बॅंकेत १३ हजार कोटींचा घोटाळा करुन देशाबाहेर फरार झाला होता. यानंतर पीएनबी बँकेने नीरव मोदीविरोधात तीनशे कोटी रुपयांचा एक, सात हजार कोटी रुपयांचा एक आणि १७०० कोटी रुपयांचा एक, असे तीन दावे दाखल केले होते. त्यापैकी दोन दाव्यांचा निकाल आज देण्यात आला आहे.
नुकतचं सिंगापूरच्या उच्च न्यायालयाने हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबीयांची बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले होते. सिंगापूरमधील या खात्यांमध्ये ४४.४१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ईडीच्या शिफारशीनुसार भारतातील अवैध संपत्ती प्रकरणातील चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली होती.
भारतातून विदेशात पसार झालेला पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज ब्रिटनमधील कोर्टाने अर्ज फेटाळला होता. त्याच्या कोठडीत २५ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत चारवेळा नीरवचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
ब्रिटनच्या कायद्यानुसार नीरवला प्रत्येक चार आठवड्यांनंतर कोर्टात हजर करण्यात येत आहे. २९ जुलैआधी पुन्हा एकदा त्याच्या कोठडीवर सुनावणी होणार आहे. भारताची बाजू मांडत असलेल्या ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्विसला (CPS) ११ जुलैपर्यंत म्हणणं मांडावं लागणार आहे.