नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी देशातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या या बैठकीला शरद पवार, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव आणि एमके स्टालिन यांच्यासह इतर अनेक विरोधीपक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी यांनी आर्थिक पॅकेजवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारने जाहीर केलेले 20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे, असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या पँकेजमध्ये शेतकरी, स्थलांतरित मजूर, लघु आणि मध्यम उद्योजक आणि गरिबांसाठी तरतुदी करण्यात आल्याचे जाहीर केले. मोदींनी पँकेजची घोषणा केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग पाच दिवस पत्रकार परिषद घेत त्याबाबत माहिती दिली. हे सर्व म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. सरकारने 20 कोटींचे पॅकेजची घोषणा करताना विरोधी पक्षासोबत सल्लामसलत केली नाही. त्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन टाकला, असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांनी कोरोनाशी लढा देण्याच्या सरकारच्या रणनीतीवर टीका केली. स्थलांतरी कामगार भुकेल्या अवस्थेत हजारो मीटर पायी चालत आपले घर गाठत आहेत. देशातील स्थलांतरित मजुरांच्या १३ कोटी कुटुंबीयांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. लॉकडाऊनचे निकषासंबधी सरकार अनिश्चत असून स्थलांतरित कामगार आणि लॉकडाऊनच्या मुद्दय़ाबाबत सरकारकडे कोणतेही धोरण नाही. कोरोना संकटापूर्वीच नोटाबंदी, जीएसटी सारख्या एकतर्फी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था खालवली होती, असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे.