उज्जैन - भारतात असणाऱ्या १२ ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात नेहमी भाविक गर्दी करीत असतात. अनलॉकनंतर हे मंदिर उघडण्यात आले होते. मात्र उज्जैनमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण सतत वाढत आहेत. गेल्या ५ दिवसात ४५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यातील बहुतेक रुग्ण हे परराज्यातून आलेले होते. त्यामुळे परराज्यातील भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
मंदिर प्रशासनाच्या या निर्णयानुसार यापुढे काही काळ फक्त मध्ये प्रदेशातील भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. सध्या दर्शनाचा लाभ ऑनलाईन बुकिंग आणि फ्री बुकिंगच्या माध्यमातून भाविकांना मिळत असतो. त्यामुळे बाहेरुन येणारे लोकही हे बुकिंग करीत असतात. यापुढे हे बुकिंग बंद असेल. याबद्दलच्या सूचना वेबसाईटवरुन दिली जाणार आहे. पुढील निर्णय होईपर्यंत परराज्यातील भाविकांसाठी प्रवेश बंद राहणार आहे.