लखनौ - उत्तरप्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे. या जिल्ह्यांमध्ये खून, मारामाऱ्या, अत्याचार, खंडणीसारखे गुन्हे सर्सास घडतात. इटाह जिल्हा त्यातील एक. या जिल्ह्यामध्येही गुन्हेगारी फोफावली आहे. मात्र, या जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील गुन्हेगारी संपली की काय? अशी माहिती समोर आली आहे. इटाह रेल्वे स्टेशनच्या बाहेरील जीआरपी पोलीस ठाण्यात मागील १९ वर्षांत फक्त २ गुन्हे दाखल झाले आहेत.
शहरातील बाकी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांच्या फायली धूळ खात पडलेल्या आहेत. मात्र, जीआरपी पोलीस ठाण्याचं एफआयआर दाखल करण्याची नोंदवही रिकामीच राहीलयं. जीआरची पोलीस ठाणे २००१ साली सुरू करण्यात आलयं. तेव्हा पासून एक खुनाचा आणि दुसरा मारहाणीचा असे दोनच गुन्हे दाखल झाले आहेत. तर यातील पहिला गुन्हा तब्बल १६ वर्षांनंतर नोंदवण्यात आला.
एटाह विभाागामध्ये १८ पोलीस ठाणे आहेत. त्यांच्यांमध्ये गुन्हा दाखल होत नाही, असा एकही दिवस जात नाही. हजारोंच्या संख्येने गुन्हे दाखल असताना जीआरपी पोलीस ठाण्यात फक्त २ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आग्र्याला जाणाऱ्या रेल्वेमध्ये एक मृतदेह मिळाल्याचा गुन्हा आणि यावर्षी एका रेल्वे कर्मचाऱ्याला मारहाणीचा गुन्हा वगळता कोणीही पोलीस ठाण्याची पायरी चढले नाही, असेच म्हणावे लागेल.
या पोलीस ठाण्यामध्ये एक उप निरिक्षकासह १० पोलीस कार्यरत आहेत. यातील दोन पोलीस एटाह वरून आग्राला जाणाऱ्या रेल्वेमध्ये सुरक्षेसाठी तैनात असतात. सायंकाळी आग्र्यावरून पुन्हा दोन्ही कर्मचारी माघारी परततात. जीआरपी पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये गुन्हेगारी कमी झाल्याचं कोणी बोलत आहे, तर कोणी आणखी तर्कवितर्क लढवत आहे.