राजस्थान - सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे जवळपास तीन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाचा फटका हा सर्वच स्तरांना बसला आहे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे शाळा आणि महाविद्यालय सध्या बंद आहेत. या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन शिक्षण सध्या देशातील अनेक शाळा आणि महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षणाचा प्रसारही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, गरीब विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ऑनलाइन शिक्षण हे वेगवेगळ्या कारणांसाठी ओझे वाटत आहे.
हेही वाचा - महिलांची लष्करात कायमस्वरुपी नियुक्ती; केंद्र सरकारने जारी केला आदेश..
सध्या शाळा, महाविद्यालय सुरू नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे कल वाढला आहे. ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईल, लॅपटॉप हे गॅझेट्स दररोज तीन ते चार तास विद्यार्थ्यांना वापरावे लागत आहेत. दरम्यान, मोबाईल आणि लॅपटॉपचा अधिक वापर केल्याचा वाईट परिणाम हा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर तसेच मानसिकतेवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बहुतेक पालक आणि विद्यार्थी ऑनलाईन क्लासच्याविरोधात आहेत. परंतु, शाळा, महाविद्यालय प्रशासनाच्या दबावामुळे पालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, ऑनलाइन क्लासमध्ये आम्हाला शिकवलेले काहीच समजत नाही. तसेच क्लास सुरू असताना अनेकवेळा नेटवर्कची समस्या निर्माण होत असल्यामुळे अनेक अडचणी येत असल्याचे गोकूळ या विद्यार्थ्याने 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. ऑनलाइन शिक्षणासाठी आमच्यावर सक्ती केली जात असून, त्यामध्ये शिकवलेले लक्षात राहत नाही. तसेच तासंतास मोबाईल, लॅपटॉप वापरावा लागत असल्यामुळे अनेक शारीरिक त्रासांचा सामना करावा लागत असल्याचे साहिल या विद्यार्थ्याने सांगितले.
हेही वाचा - तामिळनाडू; पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र परीक्षा रद्द...
दरम्यान, राजस्थानमधील बारमेर जिल्ह्याच्या सीमेवरील पालकांना तर ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. दालूराम चौधरी या पालकांचे म्हणणे आहे की, या भागात मोबाईल नेटवर्क ही एक मोठी समस्या आहे. लोकांची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नाही की ते त्यांच्या मुलांसाठी मोबाईल, लॅपटॉप खरेदी करून देऊ शकतील. त्यामुळे हे ऑनलाइन शिक्षणाचे ओझे झाल्याचे चौधरी यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
पालक असलेले कौशल राम हे सांगतात की, ग्रामीण भागात ऑनलाइन शिकवणे शक्य नाही. ते म्हणतात की, ग्रामीण भागात गरीब कुटुंबांच्या मुलांकडे फोन नसतात आणि म्हणूनच ते त्यांचा अभ्यास ऑनलाइन करू शकत नाहीत. तसेच मोबाईल किंवा लॅपटॉप घेण्याची आमची परिस्थितीही नसल्याचे कौशल राम यांनी सांगितले.
बारमेर जिल्ह्याच्या सीमाभागात नेटवर्कचा सर्वात गंभीर प्रश्न असताना विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवणार कसे? असा प्रश्न या भागात राहणारे पालक प्रवीण बोथरा यांनी प्रशासनाला विचारला आहे.
या संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आरके सोळंकी यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले की, ऑनलाइन वर्ग देखील मानसिक ताणतणावात भर घालतात आणि त्यामुळेच विद्यार्थी एकाग्र होऊ शकत नाहीत. डॉ. सोळंकी पुढे म्हणाले, ऑनलाइन वर्गांमुळे शारीरिक थकवा देखील विद्यार्थ्यांना जाणवतो.
हेही वाचा - कोरोना उपचार : दिल्लीमध्ये पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; आकारलेल्या खर्चावर रुग्णालयाची उडवाउडवीची उत्तरे
दरम्यान, पारंपारिक शिक्षण पद्धतीला पर्याय नाही. परंतु, सध्या कोरोनाच्या युगात शाळा, महाविद्यालय भरवणे हे सहज शक्य नाही. या परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न पालक करत आहेत. ऑनलाइन शिक्षण हे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आशेचे किरण म्हणून उदयास आलेली शिक्षण पद्धत आहे. परंतु, त्यात अनेक समस्या आणि आव्हाने देखील आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना यावर मात करायची आहे हे नक्की.