नवी दिल्ली - एका कोरोनाग्रस्त व्यक्तीने संचारबंदीचे नियम पाळले नाही किंवा सामाजिक अंतर राखले नाही तर महिन्याभरात हा रोगी 406 जणांना कोरोनाची लागण करतो, असे आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय, आणि आयसीएमआरने आज संयुक्त पत्रकार परिषद घेत कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. यावेळी आरोग्य मंत्रालयाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या अभ्यासाचा हवाला दिला.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांच्यासह आयसीएमआरचे तज्ज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर आणि गृहमंत्रालयाच्या सचिव पी. एस श्रीवास्तव उपस्थित होत्या.
326 रुग्णांना आत्तापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत 4 हजार 421 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील 24 तासात 354 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी 'क्लस्टर रणनीती'
सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी क्लस्टर कंन्टेन्मेंटची रणनीती आखत आहे. त्यानुसार जेथे कोरोनाचा जास्त प्रसार झाला आहे, त्या भागावर लक्ष केंद्रीत करण्यात येते. त्यानुसार आग्रा, गौतम बुद्ध नगर, भिलवाडा, पूर्व दिल्लीतील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यात यश येत आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल म्हणाले.
भारतीय रेल्वेने 2 हजार 500 डब्यांमध्ये 40 हजार आयसोलेशन बेड तयार केले आहेत. दरदिवशी 375 बेड तयार करण्यात येत आहेत. देशातील 133 ठिकाणी रेल्वे ही सेवा उपलब्ध करून देत असल्याचे ते म्हणाले.
1 लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या
देशभरात आत्तापर्यंत 1 लाख 7 हजार 6 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 136 सरकारी प्रयोगशाळांसह 59 खासगी प्रयोग शाळांना परवानगी देण्यात आल्याची माहिती आयसीएमआरचे तज्ज्ञ आर गंगाखेडकर यांनी दिली.