बेळगाव - पुरोगामी विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी एकाला बेळगावातून अटक करण्यात आली आहे. प्रवीण चतूर असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कर्नाटक एटीएस पथकाने ही कारवाई केली आहे.
कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट २०१५ ला हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गणेश मिस्कीन या आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आरोपी चतूर याला अटक केल्यांनतर या प्रकरणाचे धागेदोर हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धारवाड न्यायालयाने आरोपी चतूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी हत्येतील आरोपी एकाच विचारसरणीचे असल्याचा संशय व्यक्त केला जातो. आरोपी प्रवीण चतूर याला ६ महिन्यांपूर्वी एटीएसने अटक केली होती. मात्र, त्याला चौकशी करून सोडून देण्यात आले होते. कलबुर्गी हत्येतील आरोपींचा शोध लागल्यास त्याआधारे पानसरे, दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींचाही शोध लागण्यास मदत होईल.