मयूरभंज - रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणाने एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप आदिवासी पालकांनी केला आहे. ही घटना ओडिशामधिल मयूरभंज जिल्ह्यात घडली.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, की अंबाजोडा गावातील निरंजन बेहेरा आणि त्याची पत्नी यांनी त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला उपचारासाठी बरीपड शहरातील पीआरएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये रविवारी दाखल केले. तपासणी नंतर येथील डॉक्टरांनी या बाळाची परिस्थिती नाजूक असल्याने कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सोमवारी सल्ला दिला.
यानंतर बाळाला रुग्णवाहिकेतून बरीपड येथून कटक येथे नेण्यात येत होते. यावेळी रुग्णवाहिका तीन ते चार किलोमीटर गेल्या नंतर चालक,फार्मासिस्ट आणि सहाय्यक यांनी एनएच 18 वरील मूनचहाबाद येथे जेवणासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या ढाब्यावर थांबवली. यावेळी बाळाच्या आईने त्याना विनंती केली, की बाळाची परिस्थिती नाजूक आहे. त्याला तात्काळ उपचाराची गरज आहे, आपण लवकर जाऊ. त्या सर्वांनी लवकर जेवण आटोपण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यांनी दीड तास वेळ घेतला. यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास वेळ झाला व बाळास वेळेत उपचार मिळाले नाहीत. यामुळे बाळ दगावले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या प्रकरणी बाळाच्या आईने बेनोटी पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका चालक,फार्मासिस्ट आणि सहाय्यक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून चालकानेही मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे.