पुरी - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. राज्यातील पुरी याठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात यावे, अशी मागणी पटनाईक यांनी पत्रात केली आहे. श्री जगन्नाथ आंतरराष्ट्रीय विमानतळ असे या विमानतळाला नाव देण्यात यावे, असेही पत्रात म्हटले आहे.
![पुरी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारा; ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/od-bbs-03-naveenlattertopm-avo-7202263_01012021123814_0101f_1609484894_1040_0101newsroom_1609487431_380.jpg)
संबंधित विमानतळासाठी आवश्यक जागाही राखीव करून ठेवण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाला यासंबंधी निर्देश देऊन या प्रकल्पाला प्राथमिकता द्यावी, अशी विनंतीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पुरी येथील पर्यटनस्थळाचे महत्त्व पटनाईक यांनी पटवून दिले. भगवान जगन्नाथ यांच्या दर्शनासाठी याठिकाणी दुरवरून भाविक येतात. हिंदू धर्मातील चार धामांपैकी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. जगभरातील हिंदू या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात.
पुरी येथील रथयात्रा जगप्रसिद्ध आहे. या यात्रेत जगभरातून लाखो भाविक दाखल होत असतात. नव्याने बांधलेल्या विमानतळामुळे जगभरातील भाविक पुरी येथे दाखल होतील. यामुळे ओडिशा आणि जगन्नाथ यात्रेची संस्कृती जगभरात पोहोचण्यास मदत होईल, असेही पटनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.