जयपूर - भरतपूर जिल्ह्यातील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्याने एका विदेशी महिला पर्यटकाचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली. ही महिला जर्मनीची असून हॉटेलमध्ये मसाज करताना हा प्रकार घडला. याप्रकरणी महिलेने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडित महिला जर्मनीवरून पर्यटनासाठी भारतात आली होती. ती मथुरा गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलमध्ये थांबली होती. याच हॉटेलमध्ये एक मसाज केंद्र आहे. त्याठिकाणी ती मसाज करण्यासाठी गेली होती. त्यावेळी मसाज केंद्रातील कर्मचाऱ्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्यानंतर पीडित महिलेने आरडाओरड केला. तसेच थेट मथुरा गेट पोलीस ठाणे गाठत त्या कर्मचाऱ्याविरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.