नवी दिल्ली – चीनने साम्राज्यवादी धोरण अजूनही सुरुच ठेवले आहे. चीनने भारताचा जुना मित्र देश असलेल्या भूतानबरोबर सीमावाद उकरून काढला आहे. जागतिक पर्यावरण सुविधेची (जीईएफ) जूनच्या पहिल्या आठवड्यात बैठक झाली. या बैठकीत चीनने भारत-भूतान सीमेवर असलेल्या साकटेंग प्राणी अभयारण्याच्या (एसडब्ल्यूएस) जागेवरून आक्षेप नोंदविला.
एकीकडे जग कोरोनाच्या संकटाबरोबर लढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे मूळ ठिकाण असलेल्या चीनने भारतासह विविध देशांबरोबर सीमेवरून वाद करण्यास सुरुवात केली आहे.
माध्यमाच्या वृत्तानुसार जीईएफ परिषदेने जगभरातील विविध पर्यावरण प्रकल्पासाठी निधी जमविण्याचा निर्णय घेता आहे. मात्र, चीनने भूतानमधील अभयारण्यावरून आक्षेप नोंदविल्याने जीईएफला धक्का बसला. जीईएफच्या सदस्यांनी चीनचा आक्षेप ऑनलाईन बैठकीत तत्काळ खोडून काढला. यावेळी त्यांनी भूतानला पाठिंबा दिला. चीनने आक्षेप घेवूनही जीईएफ परिषदेने भूतानमधील अभयारण्यासाठी कार्यक्रमाचा कच्चा आराखडा स्वीकारला आहे.
भूतानने जीईएफच्या परिषदेला औपचारिक पत्र लिहून चीनच्या आक्षेपाला कडाडून विरोध केला आहे. चीनच्या आक्षेपाने भूतानच्या सार्वभौमत्वावर प्रश्न उपस्थित केल्याचे भूतानने पत्रात म्हटले आहे. चीनचे तथ्यहीन दावे निकाली काढावेत, अशी मागणी भूतान सरकारने जीईएफकडे केली आहे.
भूतान आणि चीनमध्ये 194 पासून सीमावाद आहे. तर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहच्या दौऱ्यात विस्तारवादी युग संपले असून विकासवादाचे युग आल्याचे सांगत चीनवर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यावर चीनने विस्तारवादी असल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले होते. शेजारील 12 देशांबरोबर तडजोडीने शांतता प्रस्थापित केल्याचेही चीनने म्हटले होते.
चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक तणावाची स्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे भारताने कोट्यवधींची शस्त्रास्त्रे खरेदी करत संरक्षण दल आणखी बळकट केले आहे.