श्रीनगर - काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यामध्ये सध्या केवळ स्थानिक ट्रकचालकांना प्रवेश दिला जात आहे. गेल्या आठवड्यात परराज्यांमधील ट्रकचालकांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ट्रकचालकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या तीन घटना काश्मीरमध्ये घडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यापुढेही फळ व्यापाऱ्यांवर तसेच ट्रकचालकांवर हल्ले होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने परराज्यातून काश्मीरमध्ये येणाऱ्या ट्रकना पोश्ना भागातील मुघल रोडवर थांबवून ठेवले आहे. अगदी जम्मूमधून आलेल्या ट्रकनाही काश्मीरमध्ये प्रवेश दिला जात नाहीये.
काही दिवसांपुर्वी दक्षिण काश्मीर प्रदेशात शिरमल येथे सफरचंदाच्या ट्रकवर दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाला होता. दहशतवाद्यांनी या हल्ल्यानंतर ट्रकदेखील पेटवून दिला होता. या दोन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती आहे.