हरिद्वार (उत्तराखंड) - पतंजलीच्या आयुर्वेदिक ‘स्वासरी कोरोनील किट’वर कोणतेही निर्बंध नसून देशभरात हे किट उपलब्ध होईल, असा दावा योगगुरु बाबा रामदेव यांनी केला आहे. कोरोनावरील व्यवस्थापनासाठी हे कीट असल्याचे रामदेव बाबा यांनी हरिद्वार येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनावर आयुर्वेदीक औषध शोधल्याचा दावा पतंजलीने मागील आठवड्यात केला होता. त्यानंतर पतंजलीने या गोळ्यांची जाहिरातबाजाही सुरु केली होती. मात्र, आयुष मंत्रालायने या औषधाच्या जाहिरातीवर बंदी आणत औषधाचे सर्व अहवाल तपासासाठी घतले होते. आयुष मंत्रालय पतंजलीचा दावा तपासून पाहत आहे. कोरोनाच्या औषधाची चाचणी आयुष मंत्रालयातील टास्क फोर्सकडून करण्यात आली. त्यानंतर रामदेवबाबा यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
रामदेव बाबा पत्रकार परिषदेत म्हणाले, कोरोना संसर्गाच्या व्यवस्थापनासाठी पतंजलीने योग्य काम केले आहे, असे आम्हाला आयुष मंत्रालयाने म्हटले. पतंजलीचे काम योग्य दिशेने सुरु आहे. आम्ही या औषधांसाठी राज्य सरकारकडून परवानगी घेतली आहे, राज्य सरकारे आयुष मंत्रालयाशी जोडले गेले आहे. मात्र, लायसनमध्ये ट्रिटमेंट(उपचार) हा शब्द वापरण्यात आला नाही.
आयुष मंत्रालयाशी आमचे कोणतेही मदभेद नाहीत. आता कोरोनील, स्वासरी, गिलोय, तुलसी, अश्वगंधा या औषधांवर कोणतेही निर्बंध नाहीत. आजपासून स्वासरी कोरोनिल किट कोणत्याही कायदेशीर बंधनाशिवाय देशभरात उपलब्ध होईल. आयुष मंत्रालय आणि मोदी सरकारचे धन्यवाद, असे रामदेव बाबा म्हणाले.
पतंजलीने या औषधासाठी अनेक चाचण्या केल्या आहेत. 3 दिवसात 69 टक्के तर 7 दिवसांत 100 टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. सर्व अहवाल आयुष मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. चार क्लिनिकल चाचण्यांचा अहवाल मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. आम्ही केलेले संशोधन सर्व नियमांनुसार आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.