हैदराबाद - कोरोनाबाधित रुग्णाचा रक्तगट आणि आजाराची गंभीर लक्षणे याचा काहीएक संबंध नाही, असे अमेरिकेतील मॅसाच्यूसेट जनरल हॉस्पिटलमधील (एमजीएच) संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. काही विशिष्ट रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे बालले जात आहे. मात्र, हा दावा नुकत्याच केलेल्या अभ्यासाने खोटा ठरवला आहे.
A, B आणि O या ठराविक रक्तगटाच्या रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येतात हे खरे नाही. या रुग्णांचा रक्तगटामुळे कोरोनाच्या लक्षणांवर काहीही फरक पडत नाही, असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. 'A' रक्तगटाच्या रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येतात, तसेच मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे, असे काही अहवाल समोर आले आहेत. मात्र, मॅसाच्यूसेट जनरल हॉस्पिटलच्या अभ्यासाने त्यांचा दावा फोल ठरवला आहे.
एमजीएच रुग्णालयाने त्यांच्याकडील रुग्णांच्या माहितीचा अभ्यास केला. कोरोना बाधित 1 हजार 289 रुग्णांचा संशोधकांनी अभ्यास केला. या रुग्णांचे रक्तगटही नमूद करण्यात आले होते.
रुग्णाच्या अवयवांमध्ये कोरोना संसर्गामुळे सूज येते हे अभ्यासातून प्रामुख्याने स्पष्ट झाले. ही सूज शरिरात पद्धतशीरपणे वाढत जाते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो, असा वैज्ञानिक विचार कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात होता. मात्र, अभ्यासात आम्हाला असे दिसून आले की, रक्तगट वेळवेगळा असतानाही रुग्णांमध्ये सूज दिसून आली, असे अभ्यास गटातील संशोधक दुआ यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रुग्णाच्या शरीरातील आयएल-6 या प्रोटीनचा संबंध कोरोनाची गंभीर लक्षणे दिसण्यामागे आहे, असे इंग्लमधील संशोधकांनी निष्कर्ष काढला होता. या अभ्यास गटात केंब्रीज विद्यापीठातील संशोधकांचाही समावेश होता. या प्रोटीनमुळे रुग्णाच्या शरीरात सूज वाढते, असे संशोधकांनी म्हटले होते.