नवी दिल्ली - सध्या सुरू असलेल्या कोव्हिड - 19 साथीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास होणार नसल्याचे राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे कळवले आहे. तसेच, खासगी सदस्यांचे प्रश्नही घेतले जाणार नसल्याचे सांगितले आहे.
'राष्ट्रपतींनी सोमवारी 14 सप्टेंबर, 2020 रोजी नवी दिल्ली येथे राज्यसभेची बैठक बोलावली आहे. व्यवसायांसमोर असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे हे सत्र गुरुवारी 1 ऑक्टोबर 2020 ला संपणार आहे,' राज्यसभा सचिवालयातर्फे जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, वेळापत्रकानुसार शून्य तास व अन्य कार्यवाही होईल. संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 1 ऑक्टोबरला संपणार आहे.
अधिवेशनाला येणाऱ्यांना कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. यात कोव्हिड - 19 चाचणीच्या 72 तासांत घेतलेल्या अहवालाचाही समावेश आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन दररोज आयोजित केले जाईल. यादरम्यान आठवडी सुट्टीही असणार नाही, अशी माहिती सरकारच्या सर्वोच्च सूत्रांनी माध्यमांना दिली. दोन्ही सदनांची कार्यवाही दररोज होईल. पहिल्या दिवशी (14 सप्टेंबर) लोकसभा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत आणि दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत राज्यसभेची कार्यवाही होईल.
14 सप्टेंबरनंतर राज्यसभा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत होईल. तर, लोकसभा दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत होणार आहे. संसदेची दोन्ही सभागृहे दररोज चार तास बसतील. यादरम्यान सर्व प्रकारचे सावधगिरीचे उपाय अवलंबण्यात येतील.
लोकसभेचे सभापती आणि राज्यसभा अध्यक्षांनी यापूर्वीच अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि या पावसाळी अधिवेशनासाठी कोव्हिड- 19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन कसे करावे, यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सूचना दिल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच महिन्यांत 11 अध्यादेश पारित झाले आहेत. याला मंजुरी देण्याच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये शेतकऱ्यांसाठी 'वन नेशन वन मार्केट' अध्यादेशाला प्राधान्य दिले गेले आहे. यावर कॉंग्रेसचे काही आक्षेप आहेत.
राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूकही सभागृहाच्या पहिल्याच दिवशी होणे अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकसभेचे जनता दलाचे (यू) खासदार हरिवंश संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्चमध्ये देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी काही दिवस आधी संसदेचे कामकाज अनिश्चित काळपर्यंत तहकूब करण्यात आले होते.