नवी दिल्ली : ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसींच्या अत्यावश्क वापराला औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले असून, डीसीजीआयच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्याची अथवा यावरुन राजकारण करण्याची गरज नाही असे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे.
याबाबत राजकारण दुर्दैवी..
आजचा दिवस हा देशासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. देशात तयार झालेल्या दोन लसींना डीसीजीआयने अत्यावश्यक वापरासाठी परवानगी दिली आहे. कोरोनाच्या भीतीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही नक्कीच खुशखबर आहे. त्यामुळे कोणीही यामध्ये राजकारण आणू नये. आपल्या शास्त्रज्ञांचा सन्मान करण्याऐवजी देशातील कित्येक नेते त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. माझ्यामते हे खूपच दुर्दैवी आहे, असे सिंह म्हणाले.
प्रश्न विचारा, मात्र संशोधकांवर विश्वास ठेवा..
ते पुढे म्हणाले, की लसीबाबत काही वैज्ञानिक प्रश्न असतील, तर नक्कीच विचारा. मात्र, आपल्या संशोधकांवर विश्वास ठेवा. आपल्या देशातील संशोधकांची जागतिक स्तरावर बदनामी होईल असे काही करु नका. या संशोधकांच्या मेहनतीमुळेच आज आपला देश आत्मनिर्भर होतो आहे. इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे लसीवर संशोधन सुरू आहे, त्याप्रमाणेच आपल्याकडेही आहे आणि मला आपल्या संशोधकांवर अभिमान आहे असे ते म्हणाले.
तिसऱ्या टप्प्यातील चाचणीशिवाय परवानगी कशी?
दरम्यान, काँग्रेस आणि सपाच्या काही नेत्यांनी आज डीसीजीआयच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झालेल्या नसतानाही डीसीजीआयने दोन्ही लसींना परवानगी कशी दिली? असे या नेत्यांचे म्हणणे आहे. यावरुन गिरिराज यांनी या नेत्यांना लसीबाबत राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा : हिंदु देवतांबद्दल अपमानकारक शब्द वापरणाऱ्या कलाकाराला इंदोरमध्ये अटक