नवी दिल्ली - केंद्र शासनातील अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय कमी करण्याचा कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे कामगार राज्य मंत्री जितेंद्र सिंग यांनी रविवारी सांगितले. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या वृत्ताचे सिंग यांनी खंडन केले. सध्या केंद्रातील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० आहे.
केंद्रातील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वरून ५० करण्यात येणार, अशा चर्चा सुरू आहेत. या वृत्ताचे सिंग यांनी खंडन केले आहे. सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याबाबत कोणताच प्रस्ताव मांडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंग म्हणाले, ज्या काळात देश कोरोनाव्हायरसच्या संकटाला तोंड देत आहे, तेथे काही घटक अशा बातम्या पसरवतात, हे दुर्दैवी आहे. अशा बातम्या पसरवण्याऐवजी सरकार करत असलेल्या चांगल्या कामांना प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी द्यावी, असेदेखील सिंग म्हणाले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षा ३ मेनंतर घेतल्या जाईल, असेदेखील सिंग यांनी सांगितले. ८० पेक्षा जास्त वय असलेल्या पेशंनधारकांच्या पेंशनमध्ये ३० टक्क्यांनी कपात केली जाईल, अशी खोटी बातमी गेल्या आठवड्यात पसरवण्यात आली, असे सिंग यांनी सांगितले.