चंदीगढ : शिरोमणी अकाल दल (एसएडी) शनिवारी कृषी विधेयकांच्या विरोधात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए)मधून बाहेर पडले. यानंतर पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी एनडीएवर टीकास्त्र सोडले आहे.
"तीन कोटी पंजाबी शेतकऱ्यांची दुःखे आणि आंदोलने पाहूनही जर केंद्र सरकार आपले मत बदलू शकत नसेल, तर ही एनडीए वाजपेयी आणि बादल यांच्या संकल्पनेतील एनडीए नाही" असे मत हरसिमरत कौर बादल यांनी शनिवारी व्यक्त केले. आपल्या सर्वात जुन्या सहकाऱ्याच्या म्हणण्याकडे, आणि देशाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जर सरकार दुर्लक्ष करत असेल, तर अशा पक्षासोबत युती करण्याची आम्हाला गरज नाही अशा आशयाचे ट्विट हरसिमरत यांनी केले.
यापूर्वीच केंद्राच्या तीन शेतकरी विधेयकांविरोधात पक्षाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर शनिवारी शिरोमणी अकाली दल हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच (एनडीए) बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे. शेत मालाला किमान आधारभूत किंमत कायदेशीररित्या देण्यात यावी अशी मागणी पक्षाने केली होती. मात्र, केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली नाही. तसेच पंजाबी आणि शीख प्रश्नांबाबत केंद्र सरकार असंवेदनशिलता दाखवत असल्याचे म्हणत पक्ष एनडीएतून बाहेर पडला.
हेही वाचा : कृषी विधेयक वाद : 'शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस करणार आंदोलन'