नवी दिल्ली - उत्तर कोरियातील हॅकर्सकडून कोरोना संबधीच्या बनावट मेलद्वारे उद्या(रविवार) भारतीयांवर सायबर हल्ला होण्याची शक्यता आहे. 21 जूलला सहा देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होण्याची शक्यता आहे. भारतासह सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, इंग्लड आणि अमेरिकेत हे हल्ले होण्याची शक्यता झेडडीनेट या संस्थेने वर्तवली आहे.
'लाझारुस ग्रुप' या नावाने उत्तर कोरियातील हॅकर्सकडून मोठ्य़ा प्रमाणात सायबर हॅकिंगचे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून 50 लाख व्यक्तींसह, मोठे व्यवसाय, लहान आणि मोठ्या कंपन्यांना लक्ष करण्यात येणार आहे, असे सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे.
या हल्ल्यातून हॅकर्सला आर्थिक लूट करायची आहे. ज्या व्यक्तीला मेल आला आहे, त्याला बनावट वेबसाईटवर जाण्याचे अमिष दाखविण्यात येऊ शकते. तेथून वैयक्तीक आणि आर्थिक माहिती चोरी होण्याची शक्यता आहे, असे सिंगापूरमधील सायबर सुरक्षेचे काम करणाऱ्या सायफर्माने म्हटले आहे.
'लाझारूस' या हॅकर्स ग्रुपकडे जपानमधील 11 लाख तर भारतातील व्यक्तींचे लाख ईमेल आहेत. इंग्लमधील 1 लाख 80 हजार व्यावसायिकांची माहिती त्यांच्याकडे आहे. सिंगापूमधील ज्या व्यवसायांना लक्ष्य करण्यात येईल त्यांना चीनी भाषेतील एक बनावट मेल येण्याची शक्यता आहे. त्यामधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत देण्याचे अमिष दाखविण्याची शक्यता आहे. या सायबर हल्ल्याप्रकरणी सर्व देशांना अलर्ट करण्यात आल्याचे सायफर्मा कंपनीने म्हटले आहे.
मागील सहा महिन्यांपासून कोरोनाच्या संदर्भात फसवणूक करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून करण्यात येत आहे. हॅकर्सकडून अनेक अभियाने राबवली जात आहेत. लाझारुस हा ग्रुप उत्तर कोरियाच्या प्रमुख गुप्तचर यंत्रणेकडून चालविण्यात येतो. 2014 पासून त्यांच्याकडून विविध सायबर हल्ले करण्यात येत आहेत. 2014 साली त्यांच्याकडून सोनी पिक्चरवर सायबर हल्ला केला होता. तर 2017 साली त्यांनी WannaCry हा व्हायसर अमेरिका आणि इंग्लडमध्ये सोडला होता.