नवी दिल्ली - दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमध्ये मार्च महिन्यात धार्मिक कार्यक्रम पार पडला होता. यात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांनी व्हिसा शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यावर दिल्ली न्यायालयाने बुधवारी 21 देशातील 91 नागरिकांचा जामिन अर्ज मंजूर केला आहे.
मुख्य महानगर दंडाधिकारी गुरमोहिना कौर यांनी प्रत्येकी 10 हजार रुपयांचे वैयक्तिक बंधपत्र देऊन परदेशी लोकांना अटकेपासून संरक्षण दिले. सर्व परदेशीयांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीदरम्यान न्यायालयात हजेरी लावली.
अफगाणिस्तान, ब्राझील, चीन, यूएसए, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, रशिया, अल्जेरिया, बेल्जियम, सौदी अरेबिया, जॉर्डन, फ्रान्स, कझाकिस्तान, मोरोक्को, ट्युनिशिया, युके, फिजी, सुदान, फिलिपाईन्स आणि इथिओपिया आदी देशातील नागिरकांचा समावेश आहे. यापूर्वी दिल्ली न्यायालयाने 122 मलेशियन नागरिकांचा जामिन अर्ज मंजूर केला होता.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली.